रविवार दुपार... नेहमीसारखी. अप्रतिम वामकुक्षी चाललेली.
आणि अचानक अरुंद गल्लीतून किरटया पोरांची जत्रा निघावी, प्रत्येकाने हातात येइल ते घेऊन बडवायला सुरुवात करावी तसला आवाज सुरु झाला. "काय शिंची कटकट आहे?" (सौजन्य: पुण्यातली ८ वर्ष) म्हणत उठलो, पाहतो तर धो-धो पाऊस. खिडकीत जाउन उभा राहिलो. एरवी समोर दिसणारा सीन तस्साच होता पण त्यावर कुणी तरी पाण्याच्या जाड रेषा ओढ़ल्या होत्या आणि क्षणोंक्षणी त्या वाढत होत्या. तोच नेहमीचा पाऊस तसलेच थेंब पण पड़ण्याच्या आवाजाचे प्रकार निरनिराळे. सीमेंटवरचा, फरशीवरचा, पत्र्यावरचा, पानांवरचा, अगदी पाण्यावर पाण्याचा ... असो यादी अपरिमित आहे.
उगीच वाटुन गेल हे आवाज कानावर नक्की पडले पण कधी जाणवले नाही. हे आवाजही तसे ऐकलेले. काय नव्याने वर्णन करायच त्या पावसाच. तसा विचार केला तर माणस तरी काय वेगळी असतात. तेच त्या हॉटेलमधल खाण, तेच ते सारखे कपडे, त्याच गाड्या नविन म्हणुन मिरवण, त्याच प्रश्नांची तीच उत्तर... काय अस जगावेगळ असत प्रत्येक माणसात. पण नाही. अट्टहास. कुणी तरी तश्या चपला त्या दिवशी तिथे घातल्या म्हणुन काय झाल? मी आत्ता इथे या क्षणी घातल्या आहेत ना... मी वेगळा!
तसच, प्रत्येक पाऊसही असतो वेगळा. अवकाश्याच्या ३ मिति आणि चौथा काळ, काही तरी हमखास वेगळ निघत.
पुन्हा एकदा पावसाकडे पाहिल. एव्हाना साहेब रोडावले होते. एकदम चमकून गेल, प्रत्येक पाऊस वेगळा असतो मग त्याला वेगळ व्यक्तिमत्वही असायला हव. आत्ता धो-धो पडून गेला तो बाईकवर रोरावत जाणार तरुण. सकाळी कोवळी उन्ह चढताना आली आली म्हणताना गेलेली सर म्हणजे दोन वेण्या घालून धावणारी परकरी मुलगी. राहून राहून येणारा पाउस म्हणजे "नेवर टेक नो" निग्रहाचा चिवट सेल्समन. न थांबता बदाबद पड़णारा पाऊस म्हणजे राणा प्रताप छाप मिश्या असणारा आड़दान्ड वॉचमन. भर दिवसा उन्हात रिमझिम झरणारा म्हणजे भुरभुरत्या जावळाच अर्भक. पुन्हा एकदा... असो यादी अपरिमित आहे.
Point to ponder ...PTP
11 years ago